dushkal agrim madat : महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमधील ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांसाठी एकूण ७,५०० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला आहे.
पूर्वीपेक्षा महत्वाचा बदल काय?
आधी अग्रिम मदतीची किमान रक्कम फक्त १ हजार रुपये होती. आता ती वाढवून ५ हजार रुपये करण्यात आली आहे. शिवाय, यापूर्वी ‘कुटुंब’ हा निकष लागू होता, आता तो बदलून ‘नोंदणीकृत शेतकरी’ हा निकष लागू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नोंदणीकृत शेतकऱ्याला स्वतंत्रपणे मदत मिळू शकणार आहे.
अग्रिम मदत पात्रतेचे निकष
१. दुष्काळी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट ५,००० रुपये अग्रिम मदत मिळेल.
२. ही मदत राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना थेट डीबीटी द्वारे बँक खात्यात जमा केली जाईल.
दिनांक १ नोव्हेंबर २०२५ ते आतापर्यंत ज्यांनी विविध शासकीय योजनांतर्गत ई-केवायसी केली आहे, त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही.
३. ज्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अद्याप अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक मिळालेला नाही, त्यांना ई-केवायसी च्या आधारे ही अग्रिम मदत देण्यात येईल.
कोणाला अग्रिम मदत मिळणार नाही? (अपात्र गट)
खालील गटातील व्यक्तींना ही मदत अनुज्ञेय राहणार नाही:
- महाराष्ट्र राज्यातील विद्यमान/भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा/राज्यसभा सदस्य, विधानसभा/विधानपरिषद सदस्य, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक).
- केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक वेतन २५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे.
- राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (उदा. महावितरण, एमआयडीसी, एसटी महामंडळ इ.) आणि अनुदानित संस्थांचे अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक वेतन २५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे.
- शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्त्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
- निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन २५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
- कृषि उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ), अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन २५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे.
मात्र, सहकारी साखर कारखान्यांचे हंगामी कामगार यात अपात्र ठरणार नाहीत.
महत्त्वाची सूचना
शेतकऱ्यांना कोणताही अर्ज भरावा लागणार नाही. मदत थेट अॅग्रीस्टॅक आणि ई-केवायसी डेटाच्या आधारे डीबीटी द्वारे खात्यात जमा होईल. बँकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत की या मदतीतून कोणत्याही कर्जाची वसूली करू नये.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अग्रिम मदत दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देणारी ठरेल. पात्र शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि आधार लिंक तपासून ठेवावे, जेणेकरून मदत वेळेवर मिळेल.
